“माहिती नाही मला आम्ही
कुठे जाणार आहोत..!! पक्का कसं सांगू तुला?
“तू कुठे पण जा पार्टीसाठी; मला बस
अर्ध्यातास अगोदर सांग, म्हणजे मला वेळेवर यायला बरं; नाही का?”
“ठीक आहे; कळवते मी तुला तसं” असं म्हणून
तिने फोन ठेवला आणि एवढ्या दिवसानंतर शेवटी आज तो दिवस उजाडला; तिने भेटायला
होकार दिला.
कल्याणी – तिचं नाव अगोदरच सांगून द्यावं म्हटलं; नाहीतर मग “कटप्पाने बाहुबली ला का मारलं?”
त्यापेक्षा “होती कोण ती..!!” या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड होऊन जातं मला. आमची
ओळख दोन-अडीच वर्षापासूनची. एकाच कॉलेजला शिकलो पण कॉलेजदिवसांमध्ये मात्र आमची
मैत्री तेवढ्यापुरती. Hi-Hello वाली; सगळ्यांच्या नजरेत
तेवढीच होती. पण त्यापलीकडेही एक विश्व होतं. माझ्या मनातलं. राई एवढ्या मनातलं
आभाळाएवढं विश्व.
वार्षिक संमेलनात आमची ओळख झाली, ओळखीची
दोस्ती झाली, यारी झाली आणि मग नकळत मी तिला गृहीत धरायला लागलो; खरंच. ती आहेच
इतकी सुंदर कि कुणीही सहज प्रेमात पडून जाईल तिच्या. मला माहिती आहे;
तुम्ही म्हणाल कि प्रत्येक प्रेमवीराला
हेच वाटते, त्याला आवडणारी मुलगी सर्वात सुंदर आहे; आणि हेच खरं आहे.
तिला बघताच प्रेम पक्षी मनात घिरट्या घालायला
लागायचे; थंड हळुवार वारा वाहायला लागायचा; वाटायचं, किलबिल करणारे पक्षी शांत
होऊच नये; मध्यंतराची सुट्टी कधी संपूच नये आणि तिला कोणत्या मैत्रिणीनेही हाक
मारू नये; बाहेरील फुलांचा सुगंध असाच दरवळत रहावा, माझ्या विनोदांवर तिने कायम
असंच हसत राहावं आणि मी तिच्याकडे चातकाप्रमाणे पाहत राहावं. अक्षरशः ती जवळ
असताना तीच वेड लागून जायचं. चातकाला जसं चंद्राचं लागतं ना; एकदम तसंच.
दिवसामागे दिवस निघत गेले; आमची गट्टी आणखीच
जवळीकीची झाली आणि तिच्यासाठी असणाऱ्या माझ्या मनातल्या भावना; वेळेनुसार त्याही
उमलत गेल्या... तासंतास बोलणं व्हायचं, गप्पा व्हायच्या, हसणं व्हायचं चिडवणं
व्हायचं आणि नकळतच वेळ निघून जायचा.
आणि मग;
नापास झालो म्हणून मला ते कॉलेज सोडावं
लागलं; नियमित होणाऱ्या भेटींची ताटातूट झाली. मन अस्वस्थ व्हायचं; तिच्याशी झालेली
मनाची गुंतागुंत सुटतंच नव्हती; जीव जडला होता तिच्यावर. कॉलेज सोडल्यावरही
कित्येकदा तिला भेटायच्या अपेक्षेने कॉलेज गाठलं पण तिला शोधणाऱ्या नजरेला फक्त
निशाराश झाली. ती कुण्या मैत्रिणीच्या साक्षागंधात आली नाही आणि लग्नातही नाहीच...
तिनेही भेटीचं नाव घेतलं नाही आणि मी, मी तरी कसा म्हणू; “तुझी आठवण येतीय,
भेटायचं का आपण?”
आज मनाला प्रोत्साहित केलं आणि “आपण भेटायचं
का?” विचारायला तिला फोन लावला...
“माहिती नाही मला आम्ही
कुठे जाणार आहोत..!! पक्का कसं सांगू तुला?
“तू कुठे पण जा पार्टीसाठी; मला बस
अर्ध्यातास अगोदर सांग, म्हणजे मला वेळेवर यायला बरं; नाही का?”
“ठीक आहे; कळवते मी तुला तसं” असं म्हणून
तिने फोन ठेवला आणि आज एवढ्या दिवसानंतर शेवटी आज तो दिवस उजाडला; तिने भेटायला
होकार दिला.
एकदाचं भेटायला जायचं ठरलं;
तसंही तिला नियमित भेटायला जाणं होत नाही,
म्हणून मनात एकदा विचार आला – एवढ्या दिवसाचं जे आपल्या मनात आहे ते तिला एकदाचं
सांगून द्यावं; सांगून द्यावं तिला कि किती प्रेम आहे माझं तिच्यावर; पण मग तिने
गालावर मारली एक झापड तर; तिच्या मित्रांसमोर ते अपमानजनक नसेल का ?
मनात कालवाकालव सुरु झाली; बैचेन झालो होतो; स्वतःचेच
ठोके स्पष्ट ऐकायला यायला लागले; श्वास भरायला लागला आणि डोक्यात विचारांची
उचल-ठेव सुरु झाली, कारण तिला सांगितल्यावर “तिने नाही म्हटलं” तर कदाचित मैत्री
गमावली असतीच पण मग “तिने हो म्हटलं” तर आयुष्यभर माझं प्रेम ते कायम माझं होणार
होतं...
आणि तेवढ्यात मी फेसबुक वर वाचलं – “If You
Love Someone, Just Tell Them – Nobody Gonne Hate You Just Because You Love Them;
Life is Too Short to Wait, Say Before It’s Too Late”
मग मनाशी निर्धार केला, आज सांगायचंच – बस्स
खिडकीतून चढून फुलं देणं; एक सुंदरशी डेट,
फ्लॉवर्स, Candle Light Dinner आणि Champagne च्या ग्लासमध्ये रिंग
असं काही माझ्या सारख्या Unromantic माणसाला बिलकुलच जमलं
नसतं म्हणून भलता-सलता प्रयत्न करून वाटोळ करण्याचा विचार टाकला. एक Cadbury चा Pack घेतला आणि सारंगला
म्हटलं “भाऊ, काढ रे गाडी”
निदान अर्ध्या तासात आम्ही सांगितलेल्या जागेवर पोहचलो;
आणि एक वर्ष, तीन महिने आणि दोन दिवसानंतर ती दिसली;
आधीपेक्षा जास्त सुंदर; जास्त मोहक; जास्त
प्रलोभक...
हात समोर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या;
हातात हात घेतला आणि सोडावसं वाटलाच नाही; माझ्या हाताला तिच्या त्या नाजुकश्या
हाताचा स्पर्श जसा पारीसाचा लोखंडालाच; तिला भेटवस्तू म्हणून सोबत आणलेल्या Cadbury दिल्या आणि बागेत आत जाऊन बसलो. खरं सांगायचं झालं तर एक Line Art -
Black + White Combination मध्ये काढून Gift करावसं वाटलं पण तिची-आपली भेट होईल का हेच माहिती नव्हतं मग उगीच
अतिउत्साहित होऊन जर तिला देता नसता आला तर स्वतःच्याच मनाला इजा करणं फक्त
मुर्खपणा आहे; वेळेवर Cadbury घेतल्या आणि त्याच
दिल्या.
एकमेकांना केक खाऊ घातला; आणि इकडलं-तिकडलं
बोलणं सुरु झालं; पण ती काय काय बोलली मला काहीच आठवत नाही, माझं लक्ष फक्त
तिच्याकडे होतं; तिच्या बोलण्याकडे, तिच्या हसण्याकडे, तिच्या ओठांकडे, तिच्या
केसांकडे.
पण आज वेळ मात्र निर्दयी झाला होता, तिचे
सगळे मित्र तिथे होते आणि सगळ्यांसमोर असं अचानक म्हणणं खूप Embarrassing
झालं असतं. तिथून कुठतरी बाहेर जाऊन दोन शब्द बोलावं असंही
म्हणण्यासाठी तोंड उघडत नव्हतं; वाटत होतं ज्या वेळेची आपण एका वर्षापासून वात
बघितली तो असा भराभर निघून चालला आहे आणि आपण काहीच करत नाही आहोत;
एकदाची हिम्मत केली आणि तिला हाक मारली;
“कल्याणी”
“हम्म, बोल ना... आला तेव्हाचा काहीच बोलत नाही आहेस, नाही तेव्हा तर
खूप जास्त पटर-पटर करत असतो नुसता”
“खूप दिवसांपासून विचारीन
म्हणत होतो, पण हिम्मतच होत नव्हती”
“सांग ना”
“कधी कॉफी प्यायला जाऊया का गं एकत्र”
“एवढंच?”
त्याही वेळेवर खरंतर कळलंच नाही मला, तिला
सांगावं कि सांगू नये; वाटायला लागलं, तो तिचा Decision आहे; तिला जर मी हवा असेल तर सांगेलच ती एक दिवस; पण पुन्हा विचार आला, तिला जर
मी हवा असेल तर मला ती नकोय का? तिच्या मनात जर दुसरा कुणी असेल तर मी आपल्या
भावना तिच्यावर लादणं बरं नाहीच ना; मग पुन्हा वाटलं बस चुकेल का माझी? उशीर होऊन
जाईल का?
शेवटी घरी निघायची वेळ झाली, तना-मनात निरागसता
पसरली; ती परत जातीये म्हणून मन व्याकूळ झालं; पण मी बोललोच नाही; आणि माहिती नाही
कधी बोलणं होईल आता या बद्दल. मनातल्या भावनांचा चुरडा करीत मी शांत राहलो; तिच्या
चेहऱ्याकडे बघत, तिच्या विनोदांवर हसत आणि स्वप्नांची दुनिया रंगवत.
कदाचित मी सर्वात दुर्दैवी मुलगा आहे; मला
एकतर वेळ खूप कमी वेळा मिळतो आणि तो सुद्धा मी असा वाया घालतो.
माहिती नाही तिची नि माझी पुढली भेट कधी
होईल; कधी होईलही का ? तेही ठाऊक नाहीच. पण जेव्हा होईल तेव्हा तिला नक्की सांगेल –
“कल्याणी, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे,
तू नसलीस ना सोबत, तर माहिती नाही, वेगळंच काहीतरी वाटतं, सगळं असं अपूर्ण वाटतं;
मी तुझ्यासाठी-तुझ्यासोबत असताना जे काही केलं तसा माझा स्वभाव नाहीच आहे पण तू
जवळ होतीस ना म्हणून करावसं वाटलं; कल्याणी You Make Me Complete; लग्न करशील माझ्याशी?”
-
- शुभम दातारकर